Thursday, July 15, 2010

रुपयाला मिळाली नवी ओळख...



भारतीय रुपया या चलनाला आता नवी ओळख मिळाली आहे . लवकरच आपल्या रुपयासाठी नवे चिन्ह वापरण्यास सुरुवात होणार आहे . हे चिन्ह म्हणजे देवनागरी लिपीतल्या र आणि रोमन लिपीतल्या R ( आर ) या अक्षरांचे मिश्रण आहे . आआयटी गुवाहाटीच्या उदय कुमार या तरुणाने भारतीय रुपया या चलनासाठी ही ओळख निर्माण केली आहे .

केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी २०१० - ११ साठी अर्थसंकल्प सादर करताना रुपयाला नवी ओळख मिळवून देण्याची घोषणा केली होती . जागतिक चलनाचे स्थान मिळवून देण्याबरोबरच भारतीय रुपयासाठी विशिष्ट चिन्ह निश्चित करणार असल्याचे ते म्हणाले होते . या पार्श्वभूमीवर अडीच लाख रुपयांचे बक्षिस जाहीर करत रुपयासाठी चिन्ह तयार करण्याकरिता स्पर्धा घेण्यात आली . स्पर्धेत उदयने तयार केलेल्या चिन्हासह एकूण पाच चिन्हे अंतिम फेरीसाठी निवडण्यात आली होती . ही निवड भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) , जे . जे . इन्स्टीट्युट , नॅशनल इन्स्टीट्युट ऑफ डिझाइन , ललित झा अकादमी आणि इंदिरा गांधी नॅशनल सेंटर आदींमधून सात परिक्षकांच्या समितीने केली. अखेर या पाच चिन्हांतून केंद्रीय अर्थ मंत्रालयाने उदयचे चिन्ह रुपयाची नवी ओळख म्हणून निश्चित केले आहे.

उदयने तयार केलेल्या चिन्हातून भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचे दर्शन घडते. हे चिन्ह ‘ तिरंगा ध्वज ’ या झेंड्याच्या रचनेसारखेच भासते. शिवाय र या अक्षरावरची आडवी समतोल असणारी जाड रेषा ही भारताची अर्थव्यवस्था वेगाने विकसित होत असली तरी समतोल आणि उत्तम स्थितीत असल्याचे दर्शवते, असे सांगत केंद्रीय अर्थ मंत्रालयाने उदयचे चिन्ह भारतीय रुपयाची नवी ओळख म्हणून स्वीकारले आहे . काही कायदेशीर बाबी पूर्ण केल्यानंतर हे चिन्ह वापरण्यास सुरुवात होईल .

1 comment:

  1. Microsfot Word Madhey नवीन रुपयाचे चिन्ह कसे लिहायचे ?

    http://sushant-danekar.blogspot.com/2010/07/how-to-type-new-indian-currency-symbol.html

    ReplyDelete